श्री स.स.काडसिद्धेश्वर महाराज

"श्री"चे तत्वज्ञान आणि बोध

परमार्थात सर्वश्रेष्ट स्थान सदगुरूचे असते. सदगुरू हे ब्रह्मांडाला व्यापून दशांगुले उरलेले व्यापक तत्व आहे. 

अभेध भक्ती वैराग्य जाण | स्वये आचरोनी आपण | 
देखी लावावे इतरेजन | लोकसंग्रह जाण या नाव ||

या उक्तीप्रमाणे “श्री”नी आपल्या सदगुरूवर निस्सीम भक्ती केली, किंबहुना त्या भक्तीपोटीच  ते श्रीक्षेत्र सिद्धगिरी सारख्या जगदगुरू पीठाचे मोठे वैभवशाली अधिपत्य सोडायला तयार झाले होते. वयाच्या शहाण्ण्याव्या वर्षीही, जेव्हा सदगुरू सिद्धारामेश्वरांची पालखीला सुरुवात होत, तेव्हा “श्री” स्वत: पुढच्या बाजूने खांदा देत असत. त्याच श्रद्धेच्या जोरावर त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केलेला आहे, भक्तसंग्रह केलेला आहे.

त्यांचा या शब्दात – त्यांच्या निरुपणातील वेचलेली बोधरत्ने –

मूळ काडसिद्धेश्वारांनी मला सिद्धारामेश्वरांकडे पाठविले. मी श्रीमंत झालो. श्रीमंत म्हणजे – किती काहीही असले तरी समाधानी असतो तो, नाशीवंत पदार्थ साठवून ठेवतो तो नव्हे.

आम्ही काही केले नाही. फक्त महाराजांवर विश्वास ठेवला. इतकी मुले (सभागृहाकडे निर्देश करून) झाली. मन:पूर्वक शरणागती हे आमचे भांडवल.

माझे सर्वस्व मी महाराजांना अर्पण केले. महाराजांकडे मी ज्ञान पाहिजे. महाराजच फक्त ज्ञानावर बोलायचे. 

महाराजांना सर्वस्व अर्पण केल्यामुळे त्यांनी मला एक रत्न दिले. (आत्मवस्तुची ओळख) “तुला जे रत्न दिले ते इतरांना देऊन सुखी कर,” असा आशीर्वाद दिला.

ते माझी पूजा करायचे. मी तुझी नाही मूळ काडसिद्धेश्वरांची पूजा करतो, असे म्हणायचे.

आत्मस्थिती कायम राखण्यासाठी गुरुभक्ती करा. 

महाराज मला ध्यान करायला सांगायचे, म्हणायचे तू गुरु होणार आहेस. त्यांच्या आशीर्वादामुळे हा देखावा (शिष्यवृंद) बघायला मिळतो.