"श्रीं"ची संशिप्त जीवनरेखा
महापुरुषांचा जन्म भक्तांच्या पुण्याईने होत असतो “बुडती हे जन | देखवेना डोळा | म्हणोनी कळवला येत असे |”
या उक्ती प्रमाणे हे अकारण करुणाकर असे भगवंताचे प्रतिनिधी या भूतलावर अवतार घेतात. आपले आजचे उत्सवमूर्ती समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्जल तालुक्यातील लिंगनूर गावचे धर्मशील व सज्जन गृहस्थ श्री. षटिगौडा पाटील व त्यांच्या सुशील पत्नी सौ. काशव्वाबाई यांच्या उदरी, एका संन्यासी अवधूतांच्या आशीर्वादाने २३ एप्रिल १९०५ चैत्र संकष्टी शके १८२७ रोजी झाला. त्यांचे जन्मनाव जयगौडा असे ठेवण्यास आले. वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर त्यांचे काका श्री. बाळगौडा पाटील यांनी त्यांना कोल्हापूर येथे आणून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. तेथे त्यांचे मराठी चौथीपर्यंत शिक्षण झाले.
“श्रीं” ना लहानपणी डोळे मिटल्यानंतर हरवलेल्या वस्तू दिसत असत. परमार्थ मार्गामधील ओढ त्यांना वयाच्या आठव्या वर्षापासून वाटू लागली. पाटील घराण्याचे एक गुरु श्री गंगाधर स्वामी जंगम हे नित्यनियमाने दर सोमवारी व इतर सणावारी पाटीलांचे घरी येत आणि सारे त्यांचे पादोदक घेत. सन १९२२ सालची गोष्ट – श्री गंगाधर स्वामींनी तीर्थ घ्यायला आले असता घरातील चार-पाच मुलांना म्हटले – काय रे, तुमच्यापैकी कुणी मठाला वाहून घ्यायला तयार आहे का १ सांप्रत सिद्धगिरी मठासाठी एका मुलाची जरुरी आहे. मठाधिश व्हायचे म्हणजे ब्रम्हचर्यव्रत पालन केले पाहिजे. तसेच अनेक नियमांचे पालन करून लिंगायत धर्माचे रीतसर शिक्षण घेतले पाहिजे. श्री. बाळगौडा पाटील यांनी आपला मुलगा श्री. शंकर आणि पुतण्या श्री. जयगौडा यांची नांवे सुचविली. सिद्धगिरी मठाधिपती श्री. विरुपाक्ष काडेश्वर यांनी ज्योतिषशास्त्राद्वारे श्री. जयगौडांची हस्तरेखा, बांधा, चेहरा यांचे निरीक्षण करून २ एप्रिल १९२२ या शुभदिनी श्रीक्षेत्र सिद्धागरी येथे विधियुक्त शिष्यविधान पार पाडले. अशा प्रकारे वयाच्या सतराव्या वर्षी “श्री” मठाधिश झाले. पुढे गोकार्क येथील कोण्नुर- मर्डीमठातील पाठशाळेत त्यांचे संस्कृत शिक्षण झाले. मर्डीमठाच्याच श्री. केंपय्या स्वामींच्या हस्ते “श्री”ना विधियुक्त दीक्षा देऊन त्यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी त्यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाची अधिकारसुत्रे स्वीकारली. या मठाची हजार वर्षांची परंपरा असून नवनाथांमधील सुप्रसिद्ध श्री. रेवणतीर्थापासून तिची सुरुवात आहे. या मठाखाली येणाऱ्या शिष्य लोकांची गावे बाराशेच्या वर आहेत. दिक्षा देणे, भिक्षा घेणे तसेच धर्मबाह्य वर्तन करणाऱ्याला वाळीत टाकणे असे या मठाचे अधिकार आहेत. “श्री” गावांच्या संचारास जाताना त्यांच्या बरोबर आठ घोडी, मेणा, नऊ भोई, दोन पट्टेवाले सनदी, एक कारकून, दोन कारभारी, दोन सेवक असा थाट असे. गावाच्या वेशीवर त्यांचे स्वागत व पुजा होई. इतके सारे वैभव असूनही त्यांच्या अंतर्यामी काहीतरी कमी होते. त्यांना खरे ज्ञान झाले नव्हते. त्याच वेळी त्यांच्या कानावर सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांची कीर्ती आली. तो सन १९३३ चा काळ होता. “श्री” आपल्या सेवकांसह श्रीक्षेत्र इंचगिरीस गेले व त्यांनी यांच्या मार्फत का होईना मला ज्ञान होऊ दे असे म्हणून सद्गुरू सिद्धरामेश्वरांना नमस्कार केला. सद्गुरू सिद्धरामेश्वरांनी सुद्धा “श्री” ना प्रतिनमस्कार केला. एका मोठ्या मठाचे स्वामी माझे शिष्य झाले. त्यावेळी त्यांनी उद्गार काढले, “ज्या मूळ काद्सिद्धेश्वारापासून गुरु परंपरेने मला आत्मज्ञान प्राप्त झाले, तेच ज्ञान परत त्या मूळ ठिकाणी आणून सोडण्याचे भाग्य मला लाभले. जे ऋण माझ्या गुरूला आज्या गुरूला फेडता आले नाही, ते मी फेडले. मी कृतकृत्य झालो.
आपल्या सद्गुरूंची प्रवचने सिद्धगिरी मठात व्हावीत, म्हणून शके १९५५ च्या फाल्गुन पौर्णिमेपासून “श्री”नी तीन दिवस सप्ताहा आयोजित केला. गावच्या वेशींवर “श्री” स्वत: पालखी घेऊन आपल्या सद्गुरूंना आणण्यासाठी गेले. “श्री” सद्गुरू आपल्या भरजरी वेशात पायांतील जरतारी चाध्याव्यानिशी पालखीत स्थानापन्न झाले. देवाच्या पालखीत मराठा गुरूंना बसवले ही गोष्ट इतर सेवकांना न रुचून ते नाराज होऊन परत फिरले. तसेच “श्री” हे लिंगायत धर्माचे गुरु असून त्यांनी एका मराठा गुरुकडून बोध घेतला, हे त्यांनी धर्मांतर केले, असे ते म्हणू लागले. परंतु “श्री”ची जाज्वल्य निष्ठा होती, तसेच त्यांना आत्मनुभूती झालेली होती. त्यामुळे त्यांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या सद्गुरूची पालखी आपल्या जेष्ठ बंधूसह स्वत: वाहिली. तेव्हा खांद्यावर घेतलेली पालखी ९७ वर्षीही त्याच निस्सीम प्रमाणे वाहत राहिले. या पालखीतून “श्री”नी जे विश्वव्यापक तत्वज्ञान आणले त्याचा प्रचार व प्रसार महाराष्ट्र गोवा व कर्नाटक प्रांतात अध्यात्मकेंद्र उभी करून करीत राहिले.
देवरू देवरेंदू बोगुळ तिर्परू | ब्रह्मांडद जनरेल्लरू |
अदेनु कारण वेंत्येंदोडे | ताने देवरेंब निलुकाडेय नरीयद ||
देव देव अशी बोंब ब्रम्हांडातील सर्व लोक करीत आहेत. याचे मर्म – आपणच देव आहोत हे माहित नाही. मूळ काद्सिद्धेश्वरांची सर्व वेदांताचे सर असलेल्या वरील वचनाचे सूत्र हाती धरूनच “श्री”ची सर्व निरुपणे होत. याचे वर्म ते “मूळ काडप्पाच” आहेत.